उजळू दे माझी पहाट
साधावया काट्यामधुनी रेश्मी हिरवा प्रवास उंबरा ओलांडला मी उजळू दे माझी पहाट दोष हा नव्हता कुणाचा बिथरलो माझाच मी उंबऱ्या वेशीत अडलो खुंटलो माझाच मी हरवले स्वारस्य माझे मृगजली ठरताच वाट उंबरा ओलांडला मी उजळू दे माझी पहाट दुःख माझे सावरू दे, सौख्य माझे आठवू दे यातनामय भावनांचे यातनापण विरघळू दे दाटलेल्या भावनांचा आज होई गडगडाट उंबरा ओलांडला मी, उजळू दे माझी पहाट स्वप्न माझे पाझरू दे, यत्न माझे झरझरू दे नीतीच्या सौहार्दतेचे रंग सारे त्या मिळू दे ओंजळीचे स्वप्न माझ्या, क्षितिज सुंदर पायवाट उंबरा ओलांडला मी, उजळू दे माझी पहाट