मनो-अभिराम तयाचे नाव
जागृत होती आज जाणिवा शुद्ध हेतूचा ओतून भाव ।
अर्थ जगूया आज नेमका मनो-अभिराम तयाचे नाव ।।
सत्याची सांगड स्वप्नांशी, अन् क्षमतेची आव्हानांशी
गुणाकार त्या आव्हानांचा, स्वप्नांचाही होतो भार
दिवसामागून दिवस लोटती, अपुरे पडता आव्हानांशी
वाहत जावे कुठवर ओझे, विस्कटता नाते स्वप्नांशी
प्रश्नांना सुलभे ना उत्तर, नशिबाचा वाटे दुष्काळ
निदान जात्याच चुकता होते प्रयत्ननिष्ठेची आबाळ
नको विलंबू अजून रे मना, आत्मचिंतना दे अवकाश
अनन्यतेची साक्ष तू तुझ्या अस्तित्वाला दे आकार
अविष्कार तू स्वतंत्रतेचा , परतंत्राचा कर पाडाव
जागृत होती आज जाणिवा शुद्ध हेतूचा ओतून भाव ।
अर्थ जगूया आज नेमका मनो-अभिराम तयाचे नाव ।।
- वैभव शुक्ल
Comments
Post a Comment